१२० / घाम

काही दिवसां पूर्वी एक जुना सहकारी भेटला. दुपारची वेळ होती. त्याचा चेहरा घामाने डबडबलेला होता. मी तब्बेतीची चौकशी केली. जुने दिवस आठवले. हॉटेलात चहा घेतला. परत भेटायचे ठरवून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. घरी आलो पण डोक्यातून त्याचा  घामाने डबडबलेला चेहरा जात नव्हता. माझे मन 'घाम' या शब्दाभोवती पिंगा घालू लागले.

घामाचे व माणसाचे फार जवळचे नाते आहे. आपण घाम हा शब्द मराठी मध्ये वेगवेगळ्या संदर्भात वापरतो.
उदा. घाम येणे / घाम फुटणे / घाम गाळणे.

घाम येण्याचा संबंध बरेच वेळा शारीरिक व मानसिक असतो. पित्त प्रकृती असेल तर जास्त घाम येतो. तसेच वजन जास्त असेल तरीहि घाम जास्त येतो. इतर अनेक कारणांनी पण घाम  येतो. उदा. अशक्तपणा, हृदय विकारात, श्रमाचे काम करताना, उन्हाळ्यात, गरम पेय / अन्न सेवन केले असता/ खूप राग आला असता  इत्यादी. जास्त घाम आल्यास अशक्तपणा येतो. अशा वेळी मध / नारळाचे पाणी /तुळशीचे बी भिजत घातलेले पाणी किवां साधे  पाणी जास्त प्रमाणात प्यायले पाहिजे.

घाम येणे हि नैसर्गिक बाब आहे. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी घाम येतो. जास्त घाम येत असेल तर वैद्यकीय सल्ला वेळेवर घेतला पाहिजे.

घाम फुटण्याचा संबंध मनाशी जास्त असण्याची  शक्यता असते.
उदा. अपघात, अचानक वाईट बातमी कळणे, मुलाखतीच्या वेळी, लोकांसमोर बोलायची सवय नसेल तर, वगैरे.

अशा वेळी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घाम फुटणे हि त्या प्रसंगाची पहिली प्रतिक्रिया असते. मग विचार पूर्वक त्या प्रसंगाचा अभ्यास करून योग्य ती कृती केली पाहिजे. अर्थात अशा प्रसंगी निर्णय घेण्याची सवय लहानपणापासून शिकावी लागते.

घाम गाळण्याचा उल्लेख आपण बरेच वेळा करतो. उदा. घाम गाळून यश मिळविले, घाम गाळून पैसा मिळविला वगैरे.

जो श्रम जीवी आहे, तो घाम गाळूनच मजुरी कमावतो. आपण जेव्हा घाम गाळून पैसा मिळविला असे म्हणतो, तेव्हा आपण पैसा प्रामाणिकपणे मिळविला असे सूचित करतो. खरेतर श्रम प्रतिष्ठा आणि प्रामाणिकपणा हे गुण माणसाला मन:शांती देतात.

मित्रानो, लेख फारच लांबला.
तुम्हाला कधी असे विचार एखाद्या शब्दावरून सुचतात का? जरूर कळवा.